ईश्वरासोबत खोल संबंध अनुभवण्याचे चार स्तर आहेत.
१. सामिप्य
सामिप्य म्हणजे असा अनुभव होणे की आपण ईश्वराच्या खूप जवळ आहोत आणि खूप प्रिय आहोत. आणि कधी होणार हा अनुभव? ही जवळीक तुम्हाला उद्या, परवा, १० दिवसांनी जाणवेल की काही महिन्यांनी? नाही! आत्ता, या क्षणी, आपण ईश्वराच्या खूप जवळ आहात याबद्दल जागरुक व्हा. गुरु हेच करतात. गुरू तुम्हाला ईश्वरासोबत जवळीक अनुभवण्यास मदत करतात.
२. सानिध्य
सानिध्य म्हणजे ईश्वराच्या उपस्थितीची अनुभूती करणे किंवा ईश्वराचे आवाहन करणे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्ही दैवी अस्तित्वाबद्दल सजग होता; तुम्ही वर्तमान क्षणात असलेल्या ईश्वराच्या उपस्थितीचा अनुभव करता.
उदाहरणार्थ; आपण नेहमीच हवेने वेढलेले असतो परंतु आपल्याला हवेची उपस्थिती नेहमीच जाणवत नाही.
जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला हवेची उपस्थिती जाणवते. त्याचप्रमाणे, आपण नेहमी त्या दैवी अस्तित्वाने व्यापलेले असतो , परंतु आपल्याला त्याची उपस्थिती जाणवत नाही. ते दैवी अस्तित्व अनुभवण्यासाठी आपण यज्ञ करतो, पूजा करतो आणि विविध सण साजरे करतो.
३. सारूप्य
सारूप्य म्हणजे स्वतःमध्ये आणि इतर सर्वांमध्येही ईश्वराला पाहणे. याचा अर्थ, अशी प्रचिती येणे की ‘ईश्वर माझ्यामध्ये आहे आणि मी ईश्वरामध्ये आहे’. म्हणजे स्वत: मध्येही ईश्वराची अनुभूति येणे तसेच सृष्टीतील सर्व रूपांमध्येसुद्धा ईश्वराची उपस्थिती अनुभवणे.
निराकार असूनही ईश्वर सर्व रूपांमध्ये विराजमान आहे.
४. सायुज
अंतिम अवस्था म्हणजे सायुज. म्हणजे ईश्वराशी पूर्णपणे एकरूप होणे, ईश्वरात असे विलीन होणे की तुम्हाला तुमच्यात आणि ईश्वरात काही फरकच जाणवणार नाही. या स्थितीत, दोन रहात नाहीत (द्वैत नाही), फक्त एकच राहते. ही संपूर्ण एकता फक्त गहनतेतच, अस्तित्त्वाच्या निश्चल शांततेत जेव्हा तुम्ही ईश्वराशी पुर्णपणे एक होऊन जाता तेव्हाच अनुभवता येते.
या समाधीच्या चार पायऱ्या आहेत. समाधीमध्ये (गहन विश्रामाची एक अवस्था), आपण अंतिम सत्यासोबत एकरूप होऊन जातो – तेच शिव आहे.





